अमेरिकेत माजलाय सामाजिक हल्लकल्लोळ ; दोन गट झालेत पारंपारिक विरोधक !
अमेरिकेत America गर्भपात कायदा समर्थन आणि विरोधात जनमत प्रचंड तापले आहे. अमेरिकेत प्रचलित असलेला गर्भपात समर्थन असणारा कायदा बदलला जाणार आहे, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे सध्या अमेरिकेत अभूतपूर्व सामाजिक हलकल्लोळ माजला.
अमेरिकेत ‘प्रो चॉईस’ आणि ‘प्रो लाईप’ हे दोन गट पारंपरिकरित्या एकमेकांचे विरोधक आहेत. ‘प्रो चॉईस’ हा तो गट आहे, जो मानतो की, गर्भपात करावा की नाही करावा याचे अधिकार महिलांना असावेत.
गर्भपातास कायद्याने मान्यता असावी. अमेरिकेतील डेमोक्रेटिक पक्षाची विचारधारणा या गटाशी संबंधित आहे, तर ‘प्रो लाईप’ हा गट मानतो की, पोटातील भ्रुणाचा जगण्याचा अधिकार का हिरावून घ्यायचा? कोणत्याही परिस्थितीमध्ये गर्भपात करणे हे पाप आहे आणि तसा कायदा मुळीच असू नये.
या पार्श्वभूमीवर रोमन कॅथोलिक चर्चच्या विविध टप्प्यात विविध पोपनी गर्भपाताबाबत भूमिका मांडली की, ”गर्भपात करणे हे म्हणजे देव आणि निसर्गाच्या कार्यप्रणालीत हस्तक्षेप आहे, पापच आहे.” अर्थातच, ही भूमिका मांडण्यात काळाच्या ओघात बरीच लवचिकता आली.
१९७३ साली अमेरिकेत ‘रो अॅण्ड वेड’ या खटल्याच्या निर्णयातून गर्भपातासंदर्भातला कायदा संमत झाला. या कायद्याच्या विरोधात कॅथोलिक आणि इव्हान्जेलिकलच्या नेत्यांनी निरपराध मुलांच्या हत्येबद्दल प्रार्थना आणि एक दिवस उपोषण करण्याचे आवाहन केले होते. तसेच, देशात गर्भपातविरोधी मोर्चेदेखील काढण्यात आले होते. निळ्या रंगाचे कपडे घातलेल्या बाळाची आणि गर्भासारख्या दिसणार्या बाहुल्याची प्रतिकृती तयार करून त्यावर बनावट रक्त शिंपडत निषेध व्यक्त केला होता.
अमेरिकेत सत्तेचे सोपान पार करण्यासाठी गर्भपात समर्थन आणि गर्भपात विरोध हे एक समीकरणच झाले. रिपब्लिकन पक्षाने गर्भपात कायद्याला विरोध केला, तर ‘डेमोक्रेटिक’ पक्षाने समर्थन.
अमेरिकेच्या राजकीय आणि सामाजिक स्थितीचा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून गर्भपात कायदा आणि ट्रम्प यांची कारकिर्द पाहूया. ट्रम्प ज्या रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व करायचे, तो पक्ष गर्भपात कायद्याच्या विरोधात.
ट्रम्प यांच्या कारकिर्दीमध्ये गर्भपात करणारे दवाखाने आणि गर्भपातास समर्थन करणार्या स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानात कपात करण्यात आली होती. ट्रम्प यांची वाटचाल गर्भपात कायद्याला विरोध करणारी होती, असे जनमत तयार झाले.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेतले ७० टक्के लोक गर्भपात कायद्याचे समर्थक, तर केवळ ३० टक्के लोक गर्भपात कायद्याचे विरोधक. ट्रम्प यांच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्षाने न्यायालय आणि प्रशासनामध्ये गर्भपात कायद्याला विरोध असणार्या लोकांच्या नेमणुका केल्या आहेत. त्यामुळेच अमेरिकेत पुन्हा गर्भपात कायद्यास विरोध करण्याच्या कायदेशीर आणि प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या. हा कायदा बदलू नये, यासाठी लाखो अमेरिकन रस्त्यावर उतरले आहेत.
अमेरिकेत स्त्री म्हणून एका महिलेच्या मूलभूत अधिकाराबाबत काय सुरू आहे? आपल्या शरीरासंदर्भातले, लैंगिक परिमाण आणि परिणामासंदर्भातले निर्णय ती का घेऊ शकत नाही? स्त्री-पुरूष समानतेच्या आयामात आज अमेरिकन स्त्री कुठे आहे? जगभरात महिलांचे हक्क नाकारणारे अनेक नियम कायदेशीररित्या कार्यान्वित आहेत. त्यातला एक म्हणजे सुदानमध्ये मुलींच्या लग्नाचे वय दहा आहे.
माल्टासारख्या देशात कोणत्याही वयोगटातल्या मुलीचे अपहरण करून तिचा बलात्कार जरी केला आणि गुन्हेगाराने तिच्याशी विवाह केला, तर तो अपराध माफ आहे.