अभिमानास्पद! चहावाल्याचा मुलगा होणार ‘कलेक्टर’!! मंगेश खिलारी देशात 396 वा; वडिलांच्या अपार कष्टाचे मुलाने पांग फेडले..

spot_img

अभिमानास्पद! चहावाल्याचा मुलगा होणार ‘कलेक्टर’!! मंगेश खिलारी देशात 396 वा; वडिलांच्या अपार कष्टाचे मुलाने पांग फेडले..

अहमदनगर – केंद्रीय लोकसेवा आयोग केवळ सुखवस्तू परिवारातील मुलांसाठीच असल्याची धारणा संगमनेर तालुक्यातील 23 वर्षांच्या तरुणाने साफ खोटी ठरवली आहे. सुकेवाडीसारख्या छोट्याशा गावात चहाचे दुकान चालवून आपल्या जीवनाचा गाडा हाकणार्‍या पाराजी खिलारी यांच्यापोटी जन्मलेल्या मंगेश या सुपुत्राने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण होत देशात 396 वी रँक प्राप्त केली आहे. त्याच्या या तुफान यशाने खिलारी कुटुुंब भारावले असून चहावाल्याचा मुलगा ‘कलेक्टर’ होणार या विचारानेच निकाल हाती आल्यापासून सार्‍या खिलारी कुटुंबाच्या डोळ्यांचे पाट वाहते आहेत.

पाराजी खिलारी हे गृहस्थ आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अवघ्या पाच हजार लोकवस्तीच्या सुकेवाडी गावात चहाचे दुकान चालवतात, तर त्यांची पत्नी संगिता गेल्या कित्येक वर्षांपासून विड्या बांधून आपल्या पतीच्या कष्टाला हातभार लावण्याचे काम करतात. घरची परिस्थिती बेताची म्हणून या दाम्पत्याने कधीही आपल्या दोन्ही मुलांना त्यांच्या आवडीच्या शिक्षणापासून वंचित ठेवले नाही. त्याचा परिणाम त्यांचा छोटा मुलगा मंगेश स्पर्धा परिक्षांची तयारी करु लागला.

त्याला आवश्यक असलेली पुस्तकं व अन्य शैक्षणिक गोष्टी देणं तसं या कुटुंबाच्या आवाक्याबाहेरचा विषय, मात्र त्यांनी आपल्या मुलांना कधीही त्याची जाणीव होवू दिली नाही. मात्र मुलांनीही आपल्या जन्मदात्यांचे अपार कष्ट उघड्या डोळ्यांनी पाहीलेले असल्यानेत्यांची कष्टातून मुक्ती व्हावी यासाठी त्यांचीही धडपड सुरुच होतीच. मंगेश अभ्यासात हुशार असल्याने त्याच्या आई-वडिलांसह त्याच्या भावाने त्याला सतत साथ दिली आणि त्याचा उत्साह वाढवला. त्याचा परिणाम वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी तो केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा देशात 396 वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाला.

आज या परिक्षांचे निकाल समोर आल्यानंतर ही वार्ता येवून धडकताच सुकेवाडीसह आसपासच्या गावातील अनेकजण मंगेशच्या घरी जावून त्याच्या आई-वडिलांचे अभिनंदन करीत आहेत. मंगेश खिलारीने मिळवलेल्या या यशाने त्याच्या आई-वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी आयुष्यभर उपसलेल्या कष्टाचे चीज झाले असून मुलाने आमच्या कष्टाचे पांग फेडल्याची भावना त्याच्या वडिलांनी बोलून दाखवली. आपल्या मुलाचे हे यश ऐकून त्याची आई तर सकाळपासून केवळ डोळ्यांनीच बोलत असल्याचे चित्रही सुकेवाडीतील त्यांच्या घरात दिसत आहे.

यावेळी बोलतांना मंगेशचा भाऊ रविंद्र म्हणाला की, सुरुवातीपासून त्याच्या मनात केंद्रीय लोकसेवा आयोग होता. बारावी विज्ञान शाखेत त्याला चांगले गुण मिळाल्यानंतरही त्याने कला शाखेकडे वळण्याचा निर्णय घेतला होता, त्यावेळी त्याचा हा निर्णय मलाही चुकल्यासारखे वाटतं होते. पण आज त्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर निवडलेला मार्ग योग्य असल्याचे सिद्ध केले आहे. मंगेश खिलारी या सामान्य कुटुंबातील तरुणाने मिळविलेले यश ऐकताच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्याला दूरध्वनी करुन त्याचे अभिनंदन केले आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :