अभिनेता सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या नव्हे हत्या. भाजप नेते नितेश राणे यांच्या ‘त्या’ ट्विटनं खळबळ!
अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushantsingh Rajput) मृत्यू प्रकरण आता आणखीच तापण्याची चिन्ह आहेत. भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी नुकताच यासंदर्भात एक व्हिडिओ (Video) शेअर केलाय.
सुशांतसिंह राजपूतचा मृतदेह पोस्टमॉर्टेमला नेला जात असतानाचा हा व्हिडिओ असल्याचा दावा त्यांनी केलाय. या व्हिडिओत तो मृतदेह घेऊन जाणारे रुपकुमार शाह दिसत असल्याचा दावाही त्यांनी केलाय.
सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या नसून हत्या झाली असावी, असा दावा पोस्टमॉर्टेमच्या वेळी उपस्थिती रुपकुमार शाह यांनी केलाय. कारण मृतदेहावर बऱ्याच जखमा होत्या, असेही शाह यांनी म्हटले आहे. रुपकुमार शाह हे पोस्टमॉर्टेमच्या वेळी उपस्थित होते, हे दर्शवण्यासाठी नितेश राणेंनी नुकतंच एक ट्विट केलंय.
शवागृहात सेवक म्हणून काम करणाऱ्या रुपकुमार शहा यांनी सुशांतची हत्याच होती, असा दावा केलाय. रुपकुमार शाह 13 ते 14 जून 2020 ला कूपर रुग्णालयातल्या शवागृहात कर्तव्यास होते, हे सांगण्यासाठी नितेश राणेंनी ट्विट केलंय. या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल आणि आता सत्य दूर नाही, असा इशारा त्यांनी दिलाय.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात रूपकुमार शाह यांना प्रमुख साक्षीदार मानलं जातंय. पोस्टमॉर्टेम अहवालात राजकीय दबावतंत्र वापरण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय.
सुशांत सिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा संबंध असल्याचा आरोप भाजपच्या काही नेत्यांच्या वतीने करण्यात येतोय. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी कऱण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. दरम्यान, रुपकुमार शाह यांना विशेष सुरक्षाही देण्यात आली आहे.